Tuesday, March 21, 2017

कैरीचे पदार्थ

कैरीचे पदार्थ
होळीनंतर हळूहळू वातावरण तापू लागतं .सारखं पाणी प्यावसं वाटतं .तहान भागत नाही .उन्हातून आल्यावर थंडगार पन्ह ,जेवताना कैरीचं लोणचं ,कैरीची चटणी ,मेथांबा ,तक्कू ,कैरीची डाळ ,साखरआंबा किंवा गुळांबा असला तर जेवणमस्त जातं .
मैत्रिणीनो यातील बरेच पदार्थ आपणास माहित असतील .आज आपण त्याची उजळणी (Revision) करूया .
    
१)   मेथांबा
साहित्य :  १_ वाटी कैरीच्या फोडी
               १/२ वाटी गूळ
               फोडणीसाठी           तेल ,मोहरी ,जीरं ,हिंग ,हळद
               २चमचे तिखट
               पाव चमचा मेथीदाणे
               चवीप्रमाणे मीठ
कृती :प्रथम कैरी धुवून सालं काढावी .कैरीच्या लहान फोडी कराव्या .कढईत तेल ,मोहरी जीरं घालावं .मोहरी तडतडल्यावर मेथीदाणे घालावे .ते लालसर झाल्यावर हिंग ,हळद तिखट व कैरीच्या फोडी घालाव्या .  त्यावर थोडं पाणी शिंपडावं व झाकण घालून वाफ काढावी .नंतर मीठ व गूळ घालून थोडं शिजवावं .मेथांबा तयार .हा पोळी किंवा भाकरी बरोबर खायला छान लागतो .

२ )   कैरीची चटणी
साहित्य : १ वाटी खोवलेला नारळ किंवा
             खोबर्याचा किस
             १/२ वाटी किसलेली कैरी
             ४_५ हिरव्या मिरच्या
              को थिंबीर ,आलं ,
            १/२ चमचा जीरं
              चवीप्रमाणे मीठ
             आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर
कृती : वरील सगळं साहित्य बारीक वाटावे .चटणी तयार
आवडीप्रमाणे तेल मोहरीची फोडणी घालावी .

  ३) कैरी कांदा चटणी
साहित्य : २कांदे
            १/२ वाटी कैरीचा किस
            १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे
              २ _ ३ चमचे तिखट
              चवीप्रमाणे मीठ व गूळ
             फोडणीसाठी
            तेल मोहरी ,जीरं हिंग
कृती : कांदे चिरून तेलावर परतावे .त्यात वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य घालून चटणी वाटावी .तेल मोहरीची फोडणी घालावी .

४ ) तक्कू
साहित्य : १कांदा
            १/२ कैरी
             भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट (भरड )
              मीठ व गूळ
            फोडणीसाठी
           तेल ,मोहरी ,जीरं ,हिंग ,हळद ,तिखट
कृती : प्रथम कांदा किसून घ्यावा त्यात किसलेली कैरी ,मीठ ,गूळ  व शेंगदाण्याचे कूट घालून कालवावे.त्यात तिखट व फोडणी घालावी .बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावे .

५) आंबाडाळ
चैत्रगौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ करतात .
साहित्य : ४_५ तास भिजवलेली चनाडाळ 
               २वाट्या
             ४_५ हिरव्या मिरच्या
             १/२ वाटी किसलेली कैरी
              बारीक चिरलेली कोथिंबीर
              आलं ,कढिलिंब ,
              फोडणीसाठी तेल मोहरी ,जीरं
               हिंग हळद
             चवीप्रमाणे मीठ व साखर
            सजावटीसाठी खोवलेला नारळ
कृती : भिजवलेली चनाडाळ चाळणीत उपसून ठेवावी .नंतर जाडसर वाटावी .त्यात वाटलेली मिरची, आलं ,कैरी ,मीठ व साखर घालून कालवावे .
थोडी कोथिंबीर घालावी .वरून तेल ,जीरं मोहरी व भरपूर कढिलिंब व हिंगाची फोडणी घालावी .
सजावटीसाठी कोथिंबीर व खोवलेला नारळ घालावा .ही डाळ कच्चीच खातात .
आपल्याला कच्ची नको असेल तर कढईत फोडणी करून त्यात वाटलेलीडाळ  मिरची आलं घालून वाफ काढावी .नंतर किसलेली कैरी ,मीठ व साखर घालून वाफ काढावी .

    ६) कैरीचं पन्ह
साहित्य : १ कैरी .
            गूळ ,साखर ,आलं ,मीठ ,वेलचीपूड , केशर
कृती : कैरी धुवून वाफवावी .त्याचा गर काढावा .१वाटी गर असल्यास २ वाट्या गूळ  व १ वाटी साखर घालावी .१/२ चमचा मीठ घालावे .१/२ चमचा आल्याचा रस ,१चमचा वेलची पूड घालावे .सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून एकत्र करावे .
यात केशर घातल्यास रंग व सुगंध येतो .
प्रत्येकवेळी पन्ह करताना वरील मिश्रणात आवश्यक तेवढे पाणी घालावे .
आंबडगोड पन्ह तयार .
साखर व गूळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलावे .
कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण बदलते .

७) साखरआंबा
साहित्य :  १वाटी कैरीचा किस
             २ ते ३ वाट्या साखर
              १चमचा वेलचीपूड
               चमचाभर तूप
               ५ ते ६ लवंगा ,छोटा दालचिनीचा
                तुकडा .
कृती : कैरीची सालं काढून किसून घ्यावी .
कढईत तूप घालून त्यात लवंगा व दालचिनीचा तुकडा घालावा .त्यात कैरी घालून थोडी वाफवावी .नंतर साखर घालून ढवळावे .मिश्रण चांगले शिजवावे .थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिसळावी .
साखरआंबा तयार .
मी साखरआंब्यात तुपात परतलेल्या लवंगा व दालचिनीची पूड करून घालते .
आपल्याआवडीप्रमाणे घालावे  नको असल्यास घातलं नाही तरी साखरआंबा छान लागतो .

८) गुळांबा
    साहित्य : १वाटी कैरीचा किस
                 ३ ते ३ १/२(साडेतीन) वाट्या गूळ
                 ३ते ४ लवंगा ,छोटा दालचिनीचा
                   तुकडा ,व वेलचीपूड 
कृती : गुळांब्याची कृती साखरआंब्याप्रमाणे
आहे .

९)हापूस आंब्याचा साखरआंबा
  साहित्य : १वाटी कैरीचा किस
               २वाट्या हापूस आंब्याचा रस
               २वाट्या साखर
               ४_५ लवंगा ,छोटा दालचिनीचा
                तुकडा ,
               १चमचा वेलचीपूड 
                १चमचा तूप
कृती : कढईत तूप ,लवंगा ,दालचिनी घालावी .नंतर कैरीचाकिस घालून वाफ काढावी .त्यात साखर व हापूस आंब्याचा रस घालून चागलं शिजवावं .थंड झाल्यावर वेलचीपूड घालावी .
आंब्याच्या रसाऐवजी फोडी घातल्या तरी छान लागतात .
हा साखरआंबा खूप छान लागतो .हापूस आंब्याचा सुगंध आहाहा ! क्या बात है।
काय मग मैत्रिणींनो करताय ना हे पदार्थ
धन्यवाद .
            सौ .मानसी शरश्र्चंद्र भोसेकर ...